नवी दिल्ली : विवाह झाल्यानंतर केवळ आठ महिन्यांच्या काळातच एका हत्येप्रकरणी तुरुंगात जाण्याची वेळ आली. त्यामुळे पिता होण्याची इच्छा व्यक्त करीत एका कैद्याने अंतरिम जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी याचिका दाखल केली आहे. आपण तुरुंगात राहिलो तरी भविष्यात आपली पत्नी मुलाच्या साहाय्याने जीवन आनंदात व्यतित करेल, असे या कैद्याने याचिकेत नमूद केले आहे.
२00८ मध्ये एका हत्येप्रकरणी संदीप त्यागी नामक एका व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. उल्लेखनीय बाब म्हणजे आठ महिन्यांपूर्वीच त्यागीचा विवाह झाला होता. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी संदीपच्या याचिकेवर दिल्ली सरकारकडे विचारणा केली असून, ७ मेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ४५ दिवस आपली अंतरिम जामिनावर सुटका करण्याची मागणी संदीप त्यागीने केली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) नोकरी केलेला संदीप त्यागी फेब्रुवारी २00८ मध्ये विवाहबंधनात अडकला होता. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी अपहरण आणि हत्येप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यागीला या वेळी अटकही झाली होती. आजतागायत तो तुरुंगात कैद आहे. त्याला पुत्रप्राप्ती झाली नसल्यामुळे पिता होण्याची इच्छा मनी बाळगून त्यागीने वैवाहिक सुखाचा भोग घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष बाब म्हणजे माता-पित्यांचा विरोध असतानाही त्यागीने प्रेमविवाह केला होता. त्यामुळे सद्य:स्थितीत त्याची पत्नी घरी एकटीच असते. त्यामुळे तिच्या विरंगुळय़ासाठी पुत्रप्राप्ती व्हावी, अशी इच्छा संदीप त्यागीने याचिकेतून व्यक्त केली आहे. दरम्यान, संदीपची पत्नी सध्या सीआरपीएफमध्ये कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.
|